PUNE: ‘विस्तारित मेट्रो’बाबत पीएमआरडीएकडून तपासणी

पुणे – शहरात आता मेट्रो मार्गांचा विस्तार करण्यासाठी विविध मार्गांवर चाचपणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवाजीनगर ते लोणी काळभोर या दरम्यानचा विस्तारित मेट्रो प्रकल्प खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) करायचा की ठेकेदाराची नेमणूक करून (ईपीसी) करायचा, याची तपासणी करण्यासाठी आर्थिक तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सुरू करण्यात आली आहे.
पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या मार्गाचे विस्तार करून तो लोणीकाळभोरपर्यंत करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने घेतले आहे. खडकवासला ते खराडी 28 किलोमीटर मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे.
पीएमआरडीएचा विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर, तर एक फाटा सासवड रोडवर, असा आहे. तर महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी, असा आहे. या दोन्ही मार्गावर पुलगेट ते हडसपर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग कॉमन (एकत्रित) असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माण या ठिकाणी मेट्रोसाठी कारडेपो आहे.
तसेच लोणीकाळभोर या ठिकाणी देखील मेट्रोच्या कार डेपोसाठी आरक्षण ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुलगेट ते हडपसर हा या मेट्रो मार्गाचे काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीएमआरडीएची आहे. तर खडकवासला येथे मेट्रोसाठी कारडेपो करण्यात येणार आहे, त्यामुळे पुलगेट ते हडपसर या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम आम्ही करतो, असे महामेट्रोचे म्हणणे आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली यावर निर्णय घेण्यासाठी पुम्टा अर्थात पुणे महानगर वाहतूक प्राधिकरणाची बैठक झाली.
पीएमआरडीएकडून कामकाजास गती
त्यानुसार शिवाजीनगर ते लोणीकाळभोर दरम्यान मेट्रोच्या विस्तारीकरण कोणत्या पद्धतीने करणे योग्य होईल, याबाबत निर्णय घेण्यासाठी पीएमआरडीएने आर्थिक तांत्रिक सल्लागार नेमावा, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल यापूर्वीच पीएमआरडीएने केला आहे. आता या मार्गाचा आर्थिक तांत्रिक सल्लागार नेमण्याची निविदा प्रक्रिया पीएमआरडीएकडून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.





