PMRDA: पूर्व हवेलीतील कचऱ्यासाठी पीएमआरडीएचा प्लॅन
PMRDA:

थेऊरमध्ये १० एकर जागेवर १५० टीपीडीचा प्रकल्प
१४ ग्रामपंचायतींचा कचरा एकाच ठिकाणी
PMRDA: पूर्व हवेलीतील वाढत्या नागरीकरणाबरोबर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. थेऊर येथे सुमारे १० एकर गायरान जागेवर १५० टन प्रतिदिन (टीपीडी) क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे पीएमआरडीएचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
२०४३ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येचा विचार करून या प्रकल्पाची क्षमता निश्चित करण्यात आली आहे. पूर्व हवेलीतील १४ ग्रामपंचायतींच्या कचरा व्यवस्थापनाला यामुळे एकत्रित व्यवस्था मिळणार आहे. पीएमआरडीएच्या आकुर्डीतील कार्यालयात याबाबत आयुक्त डाॅ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक पार पडली.
पूर्व हवेलीतील गावांमध्ये वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाचा वेग पाहता कचरा निर्मितीपुरता प्रकल्प न उभारता पुढील दोन दशकांतील संभाव्य लोकसंख्या लक्षात घेऊन १५० टीपीडी क्षमतेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात कचरा वाढल्यानंतर पुन्हा स्वतंत्र प्रकल्प उभारण्याची वेळ येऊ नये, असा या नियोजनामागील उद्देश आहे.
या ग्रामपंचायतींचा समावेश…
पीएमआरडीएच्या नियोजनानुसार, थेऊर येथील उपलब्ध गायरान क्षेत्रातील १० एकर जागा प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पात थेऊर, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, केसनंद, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, साष्टे, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव प्रयागधाम, शिंदवणे, पेठ आणि कोळवडी या ग्रामपंचायतींचा समावेश राहणार आहे.
२० कि.मी.तील गावांचा कचरा…
प्रकल्पस्थळापासून सुमारे २० कि.मी. अंतरातील ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीतील कचरा संकलित करून थेऊर येथील प्रकल्पस्थळी आणायचा आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना निश्चित केलेली टिपिंग फी भरावी लागणार आहे. प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.





