Pune | नागपूरऐवजी राजस्थानी संत्रा वेधतोय लक्ष

पुणे – नागपूर आणि आंबट-गोड सत्रा हे समीकरणच आहे. त्यामुळे संत्रा म्हटले की, नागपूरचे नाव डोळ्यासमोर येते. मात्र, सद्य:स्थितीत राजस्थान येथून आलेला संत्री ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे बाजारात नागपूरच्या संत्रा ऐवजी राजस्थानच्या संत्राला अधिक मागणी होत आहे.
मार्केटयार्डातील फळबाजारात सुमारे महिनाभरापासून राजस्थान येथून संत्राची दररोज १० ते १५ टन आवक होत आहे. राजस्थानचा संत्रा ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याने या संत्राला चांगली मागणी आहे. हा संत्रा नागपूर संत्राच्या तुलनेत आकाराने लहान आहे. रंगाने नारंगी असून चवीला गोड आहे. त्यामुळे राजस्थान येथून आलेल्या संत्राची दररोज विक्री होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
राजस्थान येथून विक्रीसाठी आलेल्या संत्राला घाऊक बाजारात प्रतिकिलोला २० ते ५० रूपये भाव मिळत आहे. राजस्थानच्या संत्राचा हंगाम डिसेंबर अखेर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असणार आहे. राजस्थानच्या संत्रासह बाजारात अमरावती येथून संत्राची आवक सुरू आहे. तेथून दररोज ३० ते ४० टनाची आवक होत आहे. त्यास प्रतिकिलोला १५ ते ४० रूपये भाव मिळत आहे.
सद्य:स्थितीत संत्राचा बहर सुरू आहे. हा बहर आणखी दीड महिना सुरू असणार आहे. अमरावतीचा संत्रा आकाराने मोठा आहे. या संत्राची साल जाड असून चव आंबट-गोड आहे. तसेच रंगाला हा संत्रा हिरवा आहे. त्यामुळे या संत्राचा भाव कमी असला, तरी राजस्थानच्या संत्र्याला अधिक मागणी आहे.
मृगबहरात भाव चांगले…
आता बहर हंगाम सुरू आहे. जानेवारीच्या पंधरा तारखेनंतर मृगबहर हंगाम सुरू होणार आहे. या हंगामात अहिल्यानंतर येथून संत्राची मोठ्या प्रमाणात आवक होईल. हा हंगाम जानेवारी ते एप्रिलपर्यंत असतो. मृगबहर या हंगामात शहरासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात संत्राला मागणी वाढत असते. त्यामुळे भावही चांगले असणार आहेत. सद्य:स्थितीत संत्राचे घाऊक बाजारातील भाव मागील वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत. अशी माहिती मार्केटयाडर्शतील व्यापारी सोनू ढमढेरे यांनी दिली.





