Pune : खराडीतील मिळकतींच्या मालकी हक्काची चौकशी

पुणे : खराडीतील मिळकतींच्या मालकी हक्काच्या चौकशीसाठी भूमि अभिलेख उपअधीक्षक यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून चौकशी सुरू केली जाणार आहे. ती पूर्ण झाल्यानंतर येथील सुमारे बारा हजार मिळकतींना मालकी हक्काचा पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे.
ईटीएस मशिन, रोव्हर आणि ड्रोनच्या मदतीने खराडी येथील ७०० हेक्टरवरील मिळकतींच्या सर्व्हेक्षण, मोजणी आणि नकाशे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ते महापालिकेकडे पाठविण्यात आले असून, खराडीतील महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, रस्ते यासह मोकळ्या जागा निश्चित करण्यास सांगण्यात आले होते.
त्यांच्याकडून नकाशे प्राप्त झाल्यानंतर आता पुढील टप्प्यात मालकी हक्काची तपासणी व चौकशी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागातील साठ उपअधीक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यांच्या माध्यमातून दि. ७ ते ८ फेब्रुवारीदरम्यान १२ हजार मिळकतींच्या मालकी हक्क चौकशी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यासाठी मिळकतदारांना नोटीस पाठवली जात आहे. त्यासाठी मनपा मिळकतकर विभागाची मदत घेण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





