PUNE: दस्तऐवजांवरील माहिती यापुढे गोपनीय

पुणे- भाडेकरार अथवा खरेदी-विक्री दस्तऐवजांवर संबंधित पक्षकारांचे फोटो व अंगठ्याचे ठसे अनिवार्य आहेत. तसेच ओळखीसाठी पक्षकार व ओळख देणार यांचे आधारकार्ड जोडण्यात येते. हे नोंदणीकृत दस्त संकेतस्थळावरून डाउनलोड केल्यानंतर त्यातील आधार क्रमांक, आणि ठसे याचा गैरवापर होऊ नये, यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने आधार क्रमांक आणि अंगठ्याचे ठसे सुरक्षित केले आहेत. त्यामुळे आता दस्ताची प्रत डाऊनलोड केल्यानंतर त्यावर आधार क्रमांक आणि ठसे दिसणार नाही.
राज्याचा नोंदणी व मुद्रांक विभाग हा अधिकाधिक आॉनलाइन सुविधा देण्यात अग्रेसर आहे. तसेच आता नागरिकांची माहिती गोपनीय ठेवण्यास नोंदणी विभागाने प्राधान्य दिले आहे. नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावरून भाडेकरार अथवा सदनिका, दुकाने, जमिन आदी खरेदी-विक्री व्यवहारांचे दस्त डाउनलोड करता येतात. दस्तांच्या प्रती डउनलोड करण्यासाठी नोंदणी विभाग शुल्क आकारते. ई-सर्चमधून हे दस्त उपलब्ध होतात.
यापूर्वी ई सर्चमधून उपलब्ध होणाऱ्या दस्तांच्या प्रतीमध्ये आधार क्रमांक व अंगठ्याचे ठसे दिसत होते. यातून कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यूआयडीएआयने नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पक्षकारांचे अंगठ्याचे ठसे सुरक्षित करण्याच्या सूचना नोंदणी व मुद्रांक विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार नोंदणी विभागाने दि.6 जुलै 2023 पासून याची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
केवळ बरोबर असे चिन्ह दिसणार
आता दस्तांवर गोषवारा भाग-2 वर, पक्षकारांचे फोटो आणि स्वाक्षरी एवढीच दिसेल. त्याचे ठसे या ठिकाणी केवळ बरोबर असे चिन्ह दिसेल. तसेच अंगठ्याचे ठसे विभागाचे सर्व्हरवर जतन केले जाणार आहेत. ते ठसे सामान्य व्यक्तींना दिसणार नाहीत. हा उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने देशात प्रथम राबविलेला आहे.
“यूआयडीएआयने दिलेल्या आदेशानुसार नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावरून दस्त डाउनलोड केल्यानंतर त्यावर आधार क्रमांक आणि ठसे दिसणार नाही. यामुळे पक्षकारांची माहिती गोपनीय राहणार आहे.” – अभिषेक देशमुख, नोंदणी उपमहानिरिक्षक




