Mumbai News : आधार-पॅनसह मतदारांची मूळ कागदपत्रे भाजप कार्यकर्त्याकडे? खारघरमध्ये ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन
एका झेरॉक्स दुकानात कागदपत्रांच्या प्रती काढण्यासाठी गेले असताना त्यांना मतदार पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान जमा करण्यात आलेले मूळ SIR फॉर्म, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

Mumbai News : नवी मुंबईतील खारघरमध्ये मतदार पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान जमा करण्यात आलेली मतदारांची मूळ कागदपत्रे आणि SIR फॉर्म भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याकडे आढळल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
ठाकरे गटाचे खारघरमधील नेते बालेश भोजने हे एका झेरॉक्स दुकानात कागदपत्रांच्या प्रती काढण्यासाठी गेले असताना त्यांना मतदार पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान जमा करण्यात आलेले मूळ SIR फॉर्म, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता संबंधित व्यक्तीने एका व्यक्तीला फोन करून झेरॉक्स दुकानात बोलावले. हा व्यक्ती भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदारांची मूळ कागदपत्रे शासनाच्या ताब्यात असणे अपेक्षित असताना ती भाजप कार्यकर्त्यापर्यंत कशी पोहोचली, असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर संबंधित भाजप कार्यकर्ता घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर तसेच प्रांत अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे. गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यातून हटणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.






