Pune: पीएमपीतील महिला वाहकाशी अश्लील कृत्य; आगार व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News | पुणे, पीएमपीतील महिला वाहकाशी आगार व्यवस्थापकाने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आगार व्यवस्थापकाविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिला वाहकाने पीएमपी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केल्यानंतर दखल न घेतल्याने तिने आगार व्यवस्थापकाच्या केबीनमध्ये अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
याप्रकरणी सुनील धोंडिबा भालेकर (वय ४४ ,रा. चऱ्होली), संजय कुसाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला वाहकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वाहक महिला पीएमपीत २०१८ पासून काम करत आहेत. ती पुणे स्टेशन आगारातील नियुक्तीस होती.
सुनील भालेकर हा पुणे स्टेशन आगारात कामाला आहे. भालेकर वाहक महिलेला त्रास देत होता. तो तिचा पाठलाग करायचा. याबाबत महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर भालेकर महिलेला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत हाेता. महिलेला त्याने शिवीगाळ करुन तिला मारहाण केली होती. याप्रकरणाची पीएमपी प्रशासनाने खातेअंतर्गत चौकशी केली. भालेकरची पीएमपीच्या नरवीर तानाजीवाडी आगारात बदली करण्यात आली आहे.





