पुणे : खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीटदरात वाढ

पुणे – राज्यातील गावा- गावापर्यंत जाणाऱ्या एसटी सेवेलाही मराठा आंदोलनाचा फटका बसला आहे. मराठवाड्यात अनेक भागांत एसटीची तोडफोड झाल्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जवळपास 50 एसटी डेपोतून बससेवा गेल्या पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, याचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स बस वाहतूकदारांनी उचलला आहे.
खासगी बसेसच्या तिकीटदारात मोठी वाढ झाली. प्रवासी संख्या वाढली असली तरी आंदोलकांचा धोका पत्करून बससेवा द्यावी लागत असल्याचे कारण पुढे करीत खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी तिकीट दरवाढ केली आहे.
राज्यभरात मराठा आंदोलन चिघळल्याने रास्ता रोको आणि दगडफेकीने एसटी आणि खासगी बसेसचे मोठे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात 75 पेक्षा अधिक एसटी बसेसची तोडफोड झाली आहे. एसटी महामंडळाचे यात 20 कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनामुळे 20 ते 22 खासगी बसेचीही तोडफोड झाली आहे. परंतु, तिकीट दर वाढवून खासगी बस धावत आहेत. दिवाळी सण आलेला असतानाच त्या-त्या ठिकाणच्या ट्रॅव्हल्स असोसिएशनकडून तिकीट दरवाढ केली आहे. नागपूर-पुणे, नागपूर-संभाजीनगर खासगी बसेसच्या तिकीटाचे दर 3500 रुपये म्हणजेच जवळपास दुप्पट झाले आहेत.
महामंडळाला आर्थिक फटका
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यांमध्ये 22 ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाले. नांदेड, हिंगोली राज्य महामार्ग नांदेड, परभणी राज्य महामार्ग त्याचबरोबर जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील सर्व राज्य महामार्गावर आंदोलन झाले. येवला आगाराची बस सेवा बंद असल्याने 132 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येवला आगाराचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. एसटी महामंडळाला गेल्या पाच-सहा दिवसांत 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.





