Pune : अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

पुणे : राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत यापुढे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेत ५० हजार रुपयांची वाढ करण्यात येत असून, नागरिकांना आता २ लाख रुपये मिळतील, तसेच सोलरसाठी अनुदान मिळेल. त्यातून आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पंत्रप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा- २ अंतर्गत महाराष्ट्रातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र, तर १० लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान आहे. त्यात नरेगातून २३ हजार व शौचालयासाठी १२ हजार असे एकूण १ लाख ६० हजार रुपये अनुदान मिळते. या निधीत आता ५० हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरकुलासाठी २ लाखांहून अधिक रक्कम दिली जाणार आहे. घर बांधल्यानंतर सोलरसाठी अनुदान मिळेल. त्यातून आयुष्यभर मोफत वीज मिळेल. बांधलेल्या घरावर भगिनीचे, पत्नीचे नाव असलेच पाहिजे, असेही त्यांनी बजावून सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरी महाशक्ती आहेत. देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारे आहेत. आता या २० लाख कुटुंबांत प्रेमाचा संसार फुलणार आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. लाडक्या बहीण योजनेचे पैसे सुरूच राहणार आहेत.
अजित पवार म्हणाले, केंद्र सरकार महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम करत आहे. आज होत असलेला कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या काही दिवसांत देशातील नागरिकांना २ कोटी घरे देणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा आमचा प्रयत्न आहे.





