पुणे: मिळकतकर उत्पन्न 1076 कोटींवर ; सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार कर भरणा केंद्र

पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या उत्पन्नाने 1076 कोटींचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, नागरिकांना सवलतीच्या दरात मिळकतकर भरण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असून त्यात दोन दिवस शासकीय सुट्टी येत असल्याने शनिवारी आणि रविवारी दिवसभर करभरणा केंद्र सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी स्पष्ट केले.
महापालिकेकडून दरवर्षी 31 मेपूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. मात्र, या वर्षी महापालिकेकडून 15 मेपासून नागरिकांना मिळकतकराची बिले देण्यात आली. तसेच 31 मेपर्यंत ती दिली जात होती. त्यामुळे, सवलतीत कर भरण्यासाठी यंदा 31 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवार (29जुलै) व रविवारी (30जुलै) रोजी सकाळी दहा ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि सोमवार दि. 31 जुलै रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत कर भरणा केंद्र सुरू राहणार आहेत.
1076 कोटींचा कर जमा
महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2023 ते 27 जुलै 2023 या कालावधीत 1076 कोटींचा मिळकतकर जमा झाला आहे. मागील वर्षी ही रक्कम 1126 कोटी रुपयांची होती. मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम जवळपास 40 कोटींनी कमी असली तरी या वर्षी प्रत्यक्षात नागरिकांनी बिले दरवर्षी पेक्षा दीड महिना उशिरा मिळाल्याने 15 मेनंतर मोठ्या प्रमाणात भरण्यास सुरुवात केली आहे. तसेच, 31 जुलैपर्यंत कर भरल्यास नागरिकांना सवलतीसह महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या लॉटरीतही सहभागी होता येणार आहे. त्यामुळे शेवटच्या चार दिवसांत महापालिकेस आणखी 100 कोटींचे उत्पन्न मिळण्याची कर विभागास अपेक्षा आहे.
सवलतीत वाढ नाही
दरम्यान, या पूर्वी महापालिकेकडून करोना कलावाधीत सवलतीमध्ये कर भरण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, या वर्षी बिले उशिरा देण्यात आलेली असली तरी सवलतीत वाढ देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने या पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात नियमित करदात्यांसाठी लॉटरीद्वारे बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यासाठी या पूर्वीच 31 जुलैपर्यंत कर भरणारे तसेच कोणतीही थकबाकी नसलेले मिळकतकरधारकच पात्र असणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे, कोणत्याही स्थितीत सवलतीत कर भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.





