Pune: पालिकेच्या मिळकतकराचे चाक 1600 कोटींवर रूतले

पुणे – अपूरे मनुष्यबळ तसेच राज्य शासनाकडून ३४ गावांच्या शास्तीवसूलीस स्थगिती दिल्याने महापालिकेच्या मिळकतकराच्या उत्पन्नाचे चाक १६०० कोटींवर रूतले आहे. दि. १ एप्रील ते २७ सप्टेंबरअखेर मिळकतकर विभागास १ हजार ६५९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हा कर ९ लाख १६ हजार २८० मिळकतधारकांनी भरला आहे.
अद्यापही सुमारे ५ लाख ५ हजार २७ मिळकतधारकांनी कर भरलेला नाही. त्यामुळे मिळकतकर विभागास अंदाजपत्रकात दिलेले २ हजार ४०० कोटींच्या वसुलीचे उदीष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १४ लाख २२ हजार आहे.
आतापर्यंत ९ लाख १६ हजार २८० मिळकतधारकांनी १ कोटी ६५९ कोटींचा मिळकत कर जमा केला आहे. यामध्ये ऑनलाइनद्वारे ९९० कोटीचा मिळकत कर जमा झाला आहे. धनादेशादारे ४८२ कोटी तर रोख स्वरूपात १८६ कोटींचा मिळकत कर जमा झाला आहे.
थकबाकी मोहीम मंदावली…
या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच विधानसभा निवडणूका होत्या. त्यामुळे कर संकलन विभागाचे बहुतांश कर्मचारी निवडणूक कामात होते. त्यानंतर, या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आणि त्यांच्याकडे पीटी-३ अर्ज भरण्याचे काम देण्यात आले. त्यामुळे, मिळकतकर विभागाची थकबाकी वसूली मागे पडली होती.
तर, पीटी-३ अर्जांसाठी देण्यात आलेले जादा कर्मचारी काढून घेण्यात आल्याने महापालिकेच्या थकबाकी वसुलीवर त्याचा परिणाम झाला असून मिळकतकर वसुली संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
शास्तीकर स्थगितीचा फटका…
शहरातील नव्याने समाविष्ट ३४३ गावांची थकबाकी सुमारे १२ हजार कोटींच्या घरात आहे. या गावांमधील तीन पट कर आकारणी झालेल्या मिळकतींची वसुली थांबविण्याचे आदेश शासनाने महापालिकेस मार्च महिन्यांत दिले होते. हे आदेश अद्यापही कायम आहेत.
मात्र, या आदेशाचा फायदा घेत या गावांमधील तसेच शहरातील नागरिकांकडून नियमित थकबाकी वसुलीसही विरोध केला जात आहे. त्यातच, विधानसभा निवडणूका असल्याने प्रशासनावर राजकीय दबावही टाकला जात आहे.





