पुणे – सिंहगड रोडवरील जनता वसाहत ते हिंगणे चौकदरम्यानच्या पर्यायी सिमेंट रस्त्यावर बांधकामांमधून आलेला राडारोडा अनधिकृतपणे डंप केल्याचे उघड झाले आहे. याबाबत पुणे महापालिकेला कोणतीही माहिती नसल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या रस्त्याच्या बाजूने मुठा उजवा कालवा जात असून, त्यालगत महापालिकेची खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी आहे. त्यावरच हा राडारोडा टाकल्याने जलवाहिनीला धोका निर्माण झाला आहे. हिंगणे, वडगाव, नऱ्हे, धायरी आणि नांदेड सिटीकडे जाण्यासाठी या पर्यायी रस्त्याचा वापर होतो. मात्र, आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आणि मधोमध ठिकठिकाणी राडारोड्याचे ढिगारे पडले असून, वाहतुकीला अडथळा होत आहे. काही नागरिकांनी हा राडारोडा महापालिकेचाच असल्याचा दावा केला आहे, तर नागरिकांनी या वाहने घेऊन येणाऱ्यांकडे विचारणा केल्यावर अनेकदा दमदाटी केली जात आहे. प्रत्यक्षात हा पुनर्विकासासाठी पाण्यात आलेल्या बांधकामाचा राडारोडा असल्याचे स्पष्ट दिसत असून, त्यात विटा, फरशी, तसेच काँक्रीटचे ब्लाॅकही आहेत. अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रकार? हा रस्ता वर्दळीचा आहे. या रस्त्यावरच तीन किलोमीटर पुढे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय आहे. या रस्त्यावरून महापालिकेच्या घनकचरा विभागाचे दक्षता पथकही दिवसातून दोन ते तीन वेळा जाते. क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारीही या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला असताना महापालिका अधिकाऱ्यांना दिसत नाही, की संगनमताने हा प्रकार सुरू आहे, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. ‘महापालिकेकडून काही ठिकाणी राडारोडा उचलण्याचे काम सुरू आहे. मात्र, सध्या सिंहगड रोडवरील सिमेंट रस्त्यावर टाकलेला राडारोडा आमचाच आहे की नाही, याची चौकशी करण्यात येईल. तेथे तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले असून, अनधिकृत राडारोडा आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.’ – ओमप्रकाश दिवटे (अतिरिक्त आयुक्त)