Pune : रायगड, रत्नागिरीसह पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार

पुणे – राज्यात पुढील २४ तासांत रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा आज कायम असून, पुढील दोन दिवस कोकण-गोव्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला. उद्या दि. २२ जून रोजी रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ठाणे, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा घाट विभागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.





