पुणे – “एचसीएमटीआर’ निविदांचे पाकिट आज उघडणार

पुणे – महापलिकेच्या हद्दीतील बहुचर्चीत “एचसीएमटीआर’ (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिस्ट रूट अर्थात अंतर्गत वर्तुळाकार मार्ग) प्रकल्पाची निविदा मागवण्याची मुदत संपली असून, त्याची निविदा बुधवारी (दि. 22) उघडण्यात येणार आहे.

हा प्रकल्प 5 हजार 192 कोटी रुपयांचा आहे. यासाठी किती निविदा प्रशासनाकडे आल्या आहेत, त्या किती जादा किंवा कमी आहेत याची माहिती त्या उघडल्यानंतर समजणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात केली जाणार आहे.

एचसीएमटीआर रस्त्याची लांबी 36.6 किलोमीटर असणारा हा रस्ता संपूर्ण “इलेव्हेटेड’ अर्थात उन्नत असणार आहे. याची रुंदी 24 मीटरची असणार आहे. या मार्गावर 6 मार्गिका (लेन्स) असणार आहेत. त्यापैकी 2 बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. या मार्गावर बीआरटीसाठी 28 स्थानके आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आणि यांत्रिक जिने (एलेव्हेटर्स) यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आगामी 40 वर्षात वाहतुकीत होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा 50 किमी प्रति तास एवढी निश्‍चित करण्यात आली आहे. सन 2040 पर्यंत वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन या रस्त्याचे नियोजन होणार आहे. या मार्गासाठी 72 हजार 346. 816 चौरस मीटर क्षेत्र अधिग्रहित करण्यात आले आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी येत्या जूनमध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन निश्‍चित केल्याने आणि आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 5 हजार 192 कोटींचे ग्लोबल टेंडर काढण्यात आले होते. “एचसीएमटीआर’ प्रकल्पासाठी 11 कंपन्यांनी निविदा भरण्यास उत्सुकता दाखवली होती.
महापालिकेने दोन प्रकारे काम करण्याबाबत सूचवले आहे. त्यात कोणत्या कामासाठी जास्त निविदा येतील त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्‍यताही निर्माण झाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.