Pune Gramin: शिरूर येथील बी.ओ.टी प्रकल्पातील ठेकेदाराकडून महीलेची फसवणुक; थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

शिरूर : पंचायत समिती शिरूर येथील बहुचर्चित बी.ओ.टी प्रकल्पातील व्यापारी गळ्यासाठी शिरूर येथील सिमा गिरमकर (रा. शिरूर) या महिलेने बुकींग करून सन २०१५ पासून २०२२ पर्यंत ठेकेदाराला वेळोवेळी पैसे देऊनही ठेकेदाराने त्यांना गाळा देण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे त्यांचा मानसिक व आर्थिक छळ झाला आहे. त्यांना याबाबत न्याय मिळत नसल्याने त्या कुंटुबासह त्याच इमारतीवरून उडी (१५ ऑगस्ट) मारून जीवनयात्रा संपवणार आहे. त्याबाबतचे लेखी पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, तहसीलदार शिरूर पोलीस स्टेशन शिरूर यांना दिले आहे.
सिमा गिरमकर यांनी मोठ्या कष्टाने पैसे गोळा करून त्यांनी व्यवसायासाठी गाळा घेण्याचे ठरवले होते. ठेकेदाराला वेळोवेळी पैसे देऊनही ठेकेदाराने त्यांना त्या गाळ्याचे खरेदीखत करून दिले नाही. ठेकेदाराला भरलेल्या पैशाची बँक नियमाप्रमाणे त्याचे दुप्पट पैसे झाले असते. त्यांनी वेळोवेळी गटविकास अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली होती.
त्यामुळे पंचायत समिती बीओटी ठेकेदार, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्यापासून होणाऱ्या त्यांच्या आर्थिक व मानसिक छळा पासून त्यांना न्याय मिळेल का? त्यांच्या कुटुंबाच्या कष्टाच्या भरलेल्या पैशातून त्यांना जगण्यासाठी घेतलेला गाळा त्यांना आता मिळेल का?
अशा एका असह्य महिलेने तिला हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला असून त्यांना न्याय न मिळाल्यास त्या आता १५ ऑगस्ट रोजी सहकुटुंब त्याच बीओटी इमारतीवरून उडी मारणार आहे. किंवा सतरा कमानी पुलावरून उडी मारून जलसमाधी घेणार आहे. याबाबत पोलिस प्रशासन, पंचायत समिती काय भुमिका घेणार? याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.





