pune gramin : सायबर क्राइमचा धोका शिरूर तालुक्यात बळावला

तेजस फडके
निमोणे -देशात नवनवीन डिजिटल तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपली वाटचाल डिजिटल इंडियाकडे सुरू आहे. परंतु सध्या कोणतीही घरफोडी, दरोडा तसेच लूटमार न करता लोकांच्या बॅंक अकाउंटमधून पैसे गायब करणारी सायबर क्राईमची नवीन पद्धत अस्तित्वात आली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे अशिक्षित लोकांसोबत उच्चशिक्षित लोकांनाही पद्धतशीरपणे गंडा घालणारे सायबर गुन्हेगार वाढत आहेत. शिरुर तालुक्यातील शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी आणि शिरुर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्ह्याचा तपास हा पोलिसांची डोकेदुखी वाढविणारा ठरला आहे.
फेसबुक, व्हाट्स ऍप या सोशल मीडिया साईटवर काही व्यक्तींना तुम्हाला लॉटरी लागली, असे सांगत ऑनलाइन मेसेजची लिंक पाठवली जाते. जर चुकूनही त्या व्यक्तीने त्या लिंकवर क्लिक केले तर त्याच्या अकाऊंटचे डिटेल्स विचारून त्याला मोबाइलवर आलेला जढझ विचारला जातो. जर त्या व्यक्तीने तो जढझ समोरच्याला दिला तर त्याचे बॅंक अकाउंट हॅंक करुन त्याच्यातील संपूर्ण रक्कम काढली जाते. व्हाट्स अँपवर अश्लील व्हिडिओ चॅटींग करीत एखाद्या व्यक्तीला बदनामीची धमकी देत ब्लॅकमेल करुन पैसे उकळले जातात. असे प्रकार सर्रास घडत असून समाजात बदनामी होईल या भीतीने फसवणूक झालेल्या व्यक्ती पोलिसांकडे जाण्याचे टाळतात.
काही व्यक्तींना लोन ऍपवरुन लोन देऊन नंतर त्याला सतत अश्लील भाषा वापरून तू लोन भर नाहीतर आम्ही तुझे फोटो मॉर्फ करून तुला बदनाम करू, तू रेपिस्ट आहेस असे तुझ्याबद्दल व्हायरल करु, तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू, असे धमकीचे फोन आणि मेसेज यायला सुरुवात होते. त्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना त्याच्याबद्दल अश्लील फोन, मेसेज आणि मॉर्फ केलेले व्हिडीओ गुन्हेगार पाठवत असतात. शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना अनेक घडल्या आहेत. अशावेळी घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे केले आहे.
सोशल मीडियावर आलेल्या अशा संशयास्पद लिंक वर शक्यतो क्लिक करू नये ,चुकून अशी लिंक क्लिक झालीच तर आपल्या फोनमधील सर्व कॉन्टॅक्ट लिस्टला त्याबद्दल माहिती देऊन कोणी पैशाची मागणी केली तर काहीही मदत करू नये. तसेच रिझर्व्ह बॅंकेच्या नियमावली न मानणाऱ्या संस्थांकडून कर्ज स्वरूपात रक्कम घेऊ नये. फसवणूक झाली तर जवळच्या पोलीस ठाण्यात रितसर तक्रार द्यावी.
– सुरेशकुमार राऊत, पोलीस निरीक्षक, शिरुर.





