सोमाटणे – एकाच आठवड्यात घडलेल्या दोन खुनांच्या घटनांनी मावळ तालुका हादरला आहे. मंगळवारी (दि.१) कान्हे येथे एका युवकाची नातलगाने हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.४) पवन मावळ विभागातील धामणे गावात एका ७३ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच पुतण्याने जमिनीच्या वादातून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (दि.४ एप्रिल) दुपारी तीन वाजण्यापूर्वी धामणे गावच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयामागे ही घटना घडली. याप्रकरणी विक्रम सदाशिव गराडे (वय ३९ वर्षे, रा. पद्मावती मंदिरा शेजारी, धामणे ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी मंगेश किसन गराडे (वय ३७ वर्षे, रा. धामणे, ता. मावळ) याच्यावर शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी तातडीने तपास करीत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विक्रम गराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धामणे गावच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयामागे असणाऱ्या गराडे तालीम जवळ फिर्यादीचे चुलते महादेव भगवान गराडे (उर्फ भाऊ) (वय ७३ वर्षे) यांना त्यांचा पुतण्या आरोपी मंगेश गराडे याने वडीलोपार्जित शेत जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक साळी हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.