Pune Gramin : तुळापूर रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी कारवाई; विश्वसंस्कृती बंगला/फार्महाऊस लोणीकंद पोलिसांकडून सील
तुळापूर येथील कथित ‘प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी’ प्रकरणात लोणीकंद पोलिसांनी (Pune Gramin) आणखी एक महत्त्वाची कारवाई करत संबंधित विश्वसंस्कृती बंगला तथा फार्महाऊस सील केले आहे.

Pune Gramin : तुळापूर येथील कथित ‘प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी’ प्रकरणात लोणीकंद पोलिसांनी (Pune Gramin) आणखी एक महत्त्वाची कारवाई करत संबंधित विश्वसंस्कृती बंगला तथा फार्महाऊस सील केले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रवेशद्वार आणि मुख्य इमारतीला अधिकृत सील लावत परिसर ताब्यात घेतला.
पुणे शहर गुन्हे शाखेने (Pune Gramin) शनिवारी मध्यरात्री तुळापूर रोडवरील या फार्महाऊसवर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली कथित रेव्ह पार्टी उधळून लावली होती. या प्रकरणात आयोजक, व्यवस्थापक, बारटेंडर, डीजे ऑपरेटर, हाऊसकीपिंग कर्मचारी तसेच पार्टीत सहभागी झालेल्या अनेक व्यक्तींविरोधात विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी रविवारी संबंधित विश्वसंस्कृती बंगला/फार्महाऊस येथे भेट देऊन संपूर्ण जागेची पाहणी केली. तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पुरावे सुरक्षित राहावेत तसेच कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये यासाठी पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वार आणि इमारत सील केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या ठिकाणी परवानगीच्या वेळेचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. तसेच हुक्का सेवा, मद्यपान आणि अमली पदार्थांच्या वापराबाबतही तपास सुरू आहे. या संदर्भातील वैद्यकीय अहवाल, जप्त साहित्याची फॉरेन्सिक तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या तुळापूरसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या स्थळी अशा प्रकारची घटना उघडकीस आल्याने परिसरात संतापाचे वातावरण (Pune Gramin) निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून अशा प्रकारांना भविष्यात आळा घालण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, विश्वसंस्कृती बंगला/फार्महाऊस सील केल्यामुळे या प्रकरणातील तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुन्हे शाखा आणि लोणीकंद पोलीस यंत्रणा संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करीत असून आयोजकांच्या आर्थिक व्यवहारांपासून परवानगी प्रक्रियेपर्यंत सर्व बाबींची छाननी सुरू आहे.






