Pune Gramin : प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचे महिबबु सय्यद यांचे आमरण उपोषण

– अरूणकुमार मोटे (प्रतिनिधी)
शिरुर : शिरुर नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसेचे महिबबु सय्यद हे आपल्या कार्यकर्त्यांबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. शिरुर नगरपरिषदेला गेले दोन वर्षांपासून अनेक विषयांचा पाठपुरावा करुनही न्याय मिळत नसल्यामुळे अखेर नाईलाजास्तव आज (दि. ८ जुलै) पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील विषय प्रलंबित आहेत. फुटपाथवरील अतिक्रमणे, घनकचरा प्रक्रिया शास्त्रोक्त पध्दतीने न होणे, शहरातील अनधिकृत बांधकामे, रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग, अनधिकृत मोबाईल टॉवर, वीज चोरी, संस्थांवर दंडात्मक कारवाई, बस स्थानक संदर्भातील प्रश्न, पुर रेषेतील अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची दुरवस्था, सांडपाणी प्रक्रिया इत्यादी विषयांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याचे महिबुब सय्यद यांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच, या ऊपोषणासाठी प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, शिरूर शहर सचिव रविराज लेंडे, आदि उपस्थित होते. या आंदोलनाला शिरूर व परिसरातील विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा सय्यद यांनी केला आहे.





