pune gramin : जांभूळ शेती सेंद्रीय पद्धतीने यशस्वी होऊ शकते

नारायणगाव -आरोग्याचा आधारवड असलेल्या व दुर्लक्षीत जांभुळ फळाची शेती सेंद्रीय पद्धतीने यशस्वी होऊ शकते, असे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता व संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्र व जांभुळ बागाईतदार संघ (महा.राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव (ता. जुन्नर) येथे राज्यस्तरीय जांभुळ पीक परिसंवादात डॉ. हळदणकर बोलत होते.
याप्रसंगी संदीप गायके, प्रतिभा अडगळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, श्रीराम गाढवे, निवेदिता शेटे, भरत टेमकर, दीपक साकोरे, पार्थ जोशी, शीतल देशमुख, मच्छिंद्र झोडगे, महादेव बरळ, दिनेश भुजबळ, संपत कोथिंबिरे, जालिंदर बोराटे, ज्ञानेश्वर झोडगे उपस्थित होते. परिसंवादात जांभूळ फळ शेतीचे व्यवस्थापन, जांभळाच्या उन्नत जाती, फळासाठी योग्य जमीन, लागवडीतील योग्य अंतर, छाटणी तंत्रज्ञान, फुलोरा येण्यासाठी ताण व्यवस्थापन कसे करायचे,
किड व रोग नियंत्रणासाठी जैविक उपाययोजना, खतपाणी व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योगाला मिळणारे अनुदानाविषयी माहिती राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांना दिली. परिसंवादास पुणे, अहमदनगर, बीड, बुलढाणा, वाशीम, सोलापूर, सातारा, नाशिक, उस्मानाबाद, जालना, लातूर, संभाजीनगर व सूरत येथील 200 पेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले होते. प्रस्ताविक राजेंद्र तोडकर यांनी, सूत्रसंचालन ज्ञानेश कुटे यांनी, तर प्रवीण येवले यांनी आभार मानले.





