निमोणे – शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन चुलते, चुलती व त्यांच्या दोन मुलांना लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे चुलतीने तक्रार दाखल केल्याने सोमनाथ रमेश जाधव तसेच मनोज रमेश जाधव (रा. निमोणे, ता. शिरुर, ज. पुणे) या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजश्री भाऊसाहेब जाधव (वय ४८) रा.निमोणे ता. शिरुर, जि.पुणे या त्यांचे पती व दोन मुलांसह शेती करुन आपला उदरनिर्वाह करतात. निमोणे गावात गट नंबर १८८४ मध्ये त्यांचे दीर रमेश बापुराव जाधव आणि रावसाहेब बापूराव जाधव (मयत) यांच्या नावे सामायिक तीन एकर क्षेत्र आहे. त्यापैकी या दोघांनी त्यांचे हिश्यांमध्ये यापुर्वी गोठा बांधलेला आहे. तसेच राजश्री यांच्या पतीच्या हिश्याची एक एकर पडीक आहे. परंतु सदरचे सामायिक क्षेत्र त्यांचे मयत सासरे बापूराव हरिभाऊ जाधव यांच्या नावे आहे. त्यावर फक्त वारस नोंद झालेली आहे. दि ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास निमोने सामायिक गट नंबर असलेल्या तीन एकर सामायिक क्षेत्रांमध्ये राजश्री जाधव यांच्या हिश्याच्या पडीक क्षेत्रामध्ये ऊस तोडणाऱ्यांची टोळी बसलेली असल्याने राजश्री त्या ठिकाणी उसाचे वाढे आणण्यासाठी गेले असताना तिथे त्यांचा पुतण्या सोमनाथ रमेश जाधव हा आला आणि राजश्री यांना शिवीगाळ करु लागला. त्यावेळी राजश्री यांचे भाउसाहेब जाधव आणि मुलगा रोहित हे आले. त्यानंतर सोमनाथ जाधव याने रोहितला चापट मारली. त्यावेळी तेथे त्यांचा दुसरा पुतण्या मनोज रमेश जाधव हा आला. त्यानंतर दोघा पुतण्यानी तेथील लाकूड उचलुन राजश्री यांचे पती भाऊसाहेब यांच्या मांडीवर मारहान केली. तर सोमनाथ जाधव याने हातातील लाकूड राजश्री यांचा मुलगा रोहित यास मारत असताना राजश्री यांनी हात मध्ये घालत अडवले असता त्यांच्या हातात लागून दुखापत झाली. या मारहाणीत राजश्री यांच्या मानेला, हाताला कमरेला तसेच त्यांचा मुलगा मुलगा रोहित यास ओठाला डोक्याला आणि पती भाऊसाहेब यांना मांडीला मार लागला आहे. त्यानंतर राजश्री यांची मुलगी सपना हि भांडणे सोडवविण्यास आली असता तिला सोमनाथ याने हाताने मारहाण केली. तसेच दोघे पुतणे सोमनाथ आणि मनोज यांनी या कुटुंबाला ‘पुन्हा नाद केला तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे’. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशन येथे राजश्री जाधव यांनी फिर्याद दाखल केल्याने सोमनाथ रमेश जाधव तसेच मनोज रमेश जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार प्रताप टेंगले हे करत आहेत.