Pune: पुस्तके मिळाली, गणवेशापासून वंचितच

पुणे – पुण्यासह राज्यभरात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात आली. परंतु, मोठा गाजावाजा करीत घोषणा केलेल्या एक राज्य एक गणवेश, योजनेची अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली, पण, नवे गणवेश मिळाले नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
प्राथमिकपासून ते माध्यमिक शाळांचा नव्या शैक्षणिक वर्षातील शनिवारी पहिला दिवस होता. जि.प. मार्फत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेत उत्साहाने स्वागत केले.
परंतु, राज्य शासनाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना एक नियमित स्वरूपाचा तर दुसरा गणवेश स्काऊट व गाईड यासाठी मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 44 लाख 60 हजार 004 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असताना पहिल्या दिवशी मात्र नव्या गणवेशपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले.
बचतगटांना शिलाईचे काम…
राज्य शासनाच्या निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीमधील सर्व मुलींना सलवार, कमीज व दुपट्टा असा गणवेश पुरवठा केला जाणार आहे. उर्दू शाळांतील मुलींनाही असाच गणवेश असेल. याचबरोबर राज्य शासनाद्वारे विद्यार्थी व विद्यार्थिनींना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजेही पुरविण्यात येणार असून याबाबतचा निधी देखील शाळा व्यवस्थापन समितीला प्रदान केला जाणार आहे. गणवेशाचे स्थानिक बचतगटांकडून शिलाईचे काम सुरु आहे.
“जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना एकूण ७ लाख २० हजार ५६५ पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठीचे मोफत गणवेश अद्याप मिळालेले नाहीत.” – संजय नाईकडे, झेडपी प्राथमिक शिक्षणाधिकारी.





