PUNE : घोरपडी उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : घोरपडी गाव येथील पुणे -सोलापूर मिरज लाईनवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम जवळपास 80% पूर्ण झालेले असून डिसेंबर 2023 अखेर हा पूल वाहतुकी करता सुरू करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी दिली. कांबळे यांनी पूलासाठी आमदार निधीसह, राज्यशासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे. या पूलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार कांबळे यांनी नुकतीच महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन पाहणी केली.
घोरपडी येथील या रेल्वे ट्रॅक वरून दिवसभरात जवळपास 104 रेल्वे गाडया 24 तासात जातात त्यामुळे या ठिकाणी असलेले रेल्वे फाटक हे साधारण 104 वेळेस बंद होते. परिणामी, शहरातील तसेच कॅम्प भागातील नागरिकांना मुंढवा – केशवनगर- खराडी या भागात जाण्यासाठी प्रचंड त्रास होतो तसेचं शहरातील मुंढवा, घोरपडी आणि कल्याणी नगर मधील नागरिकांना शहरात येताना कोंडीचा सामना करावा लागतो.
ही समस्या सोडविण्यासाठी रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारले जात आहेत. सोलापूर मार्गावरील पूलाचे काम वेगाने सुरू आहे. तर तर पुणे मिरज – रेल्वे मार्गावरीअ वरील उड्डाणपुलाच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात आले असून दिवाळीपर्यंत या कामाची देखील निविदा मागवण्यात येऊन पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आमदार कांबळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.





