पुणे : विकासकामांचे ‘जिओ टॅंगिंग’

महापालिकेचा निर्णय : यंत्रणा असूनही होत नव्हता वापर
एकाच जागेवर दोनवेळा कामे
पुणे – महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक विकासकामाचे “जीओ टॅंगिग होणार आहे. तसेच, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधीत खात्याकडून या कामाचे प्रत्यक्ष जागेवरील अक्षांश आणि रेखांशाची नोंदणी करण्यासह त्याचे फोटो अपडेट केल्यानंतर कामांची बिले देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. यासाठी महापालिकेने 2015 मध्ये एन्टरप्रायजेस जीआयएस संगणक प्रणाली विकसित केली होती.
मात्र, याचा वापर गेल्या दोन वर्षांपासून अनेक खात्यांकडून करण्यात येत नव्हता. परिणामी, कामे झाल्याचे दाखवून तसेच किरकोळ काम करून अनेक खात्यांकडून मार्चअखेरीस तातडीची बाब म्हणून कामे केल्याचे दाखवित, ठेकेदारांना लाखो रुपयांची बिले अदा केली जात होती. या तक्रारी येऊ लागल्याने हा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेकडून शहरात वर्षभर विकासकामे केली जातात. त्यांची नोंद, प्रत्यक्ष जागेवर ही कामे केली जातात. मात्र, त्यांचे रेकॉर्ड कागदोपत्री फाईलमध्ये ठेवली जाते. त्यानंतर संबंधीत जागेवर झालेल्या कामाची माहिती इतर विभागांना होत नाही आणि कालांतराने त्याच जागेवर इतर विभाग कामे करतात. त्यामुळे अनेक कामे दोनवेळा होतात, तर दुसऱ्या कामाच्या वेळी पहिल्या कामाचे नुकसान होते. त्यामुळे कामांचा दुबारपणा आणि गैरप्रकार टाळणे यासाठी एन्टरप्रायजेस जीआयएस संगणक प्रणाली विकसित केली होती.
त्यांतर्गत जो विभाग शहरात विकासकामे करेल त्याने संबंधीत कामाचे अक्षांश-रेखांश तसेच कामाचे फोटो, काम सुरू केल्याच्या तसेच पूर्ण केल्याच्या तारखा, काम केल्याचे फोटो याची माहिती अपडेट करणे अपेक्षित होते. मात्र, सुरुवातीला माहिती अपडेट होत होती. त्यानंतर काम बंद झाल्याने प्रणाली नावालाच उरली होती. प्रशासनाने नुकताच या प्रणालीचा आढावा घेतला असून त्यात अनेक विभाग ही यंत्रणा वापरत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालिकेने वरील निर्णय दिला.





