Pune : गौरव अहुजासह मित्राला पोलीस कोठडी

पुणे : भरचौकात अलिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता) याने भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केटयार्ड) या दोघांना पोलिसांनी रविवारी (दि.९) न्यायालयात हजर केले असता न्यायाल्याने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
अमली पदार्थाचे सेवन करून या दोघांनी हा गुन्हा केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दोघांनी अमली पदार्थाचे सेवन अथवा मद्यप्राशन कुठे केले, त्यांना पळून जाण्यास कोणी मदत केली, या तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडीची माग्णी सरकारी वकील सुनिता डांगे यांनी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. पुष्कर दुर्गे आणि अॅड. सुनील रामपुरे यांनी बाजू मांडली.
गौरव आहुजावर खंडणी, जुगाराचाही गुन्हा
आरोपी गौरव आहुजा हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याच्यावर विमानननगर पोलीस ठाण्यात खंडणी मागणे, जिवे मारण्याची धमकी देणे, तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.





