Pune Ganpati Visarjan 2024 : श्रीमंत ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक ‘श्री उमांगमलज’ रथातून संपन्न, पाहा Video…

Pune Ganpati Visarjan 2024 (Dagdusheth Ganapati) : पुणे शहरातील प्रसिद्ध आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा देखील उत्साहात आणि पारंपारिक थाटात पार पडली. जगभरात प्रसिद्ध असलेला गणपती म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन रात्री 9.00 वाजता झाले. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या उत्सवाचं यंदा 132 वं वर्ष होते.
यंदा सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणरायाची मूर्ती उमांगमलज रथामध्ये विराजमान करण्यात आली होती. त्यावर सुंदर विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती. हा रथ यंदा मिरवणूकीचे विशेष आकर्षण ठरला. मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांची गजर, नगारे, ढोल ताशा पथक, सनई चौघडा हे वाद्यं देखील विशेष आकर्षण ठरले.
वाजत गाजत आलेली ही गणरायाची स्वारी पाहण्यासोबतच श्रीं चे दर्शन घेण्याकरिता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. हा रथ व श्रीं चे विलोभनीय रूप डोळ्यात साठविण्यासोबतच मोबाईल मध्ये देखील अनेकांनी टिपले. यावेळी मोरया, मोरया… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या निनादाने लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमून गेला होता.
मंदिरातून दुपारी चार वाजता बाप्पाची मिरवणूक निघाली आणि ती पांचालेश्वर घाट येथे 8.47 वाजण्याच्या आसपास पोहचली आणि त्यानंतर पांचाळेश्वर मंदिरात विधीवत पूजा आणि आरती करून पांचाळेश्वर घाटावर रात्री 9 च्या सुमारास विसर्जन करतं बाप्पाला निरोप देण्यात आला.
उमांगमलज रथ ठरला विशेष आकर्षण…
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी उमांगमलज रथ बनविण्यात आला होता. जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीवर आधारित हा रथ 15 बाय 15 फूट आकाराचा होता, ज्याची उंची 24 फूट होती. रथावर 8 खांब साकारले होते, प्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे आकर्षक डिझाईन कोरण्यात आले होते. या खांबांवर विशेष विद्युत रोषणाईचा वापर करण्यात आला होता. एलईडी आणि पार लाईट्सने रथ उजळून निघाला होता. गणेशोत्सवाच्या उत्सवाची रंगत वाढवणारी ही सजावट पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.





