Pune Ganpati Visarjan 2024 : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन, जाणून घ्या विसर्जनाविषयी सर्व डिटेल्स आणि पाहा Video एका क्लिकवर….

Pune Ganpati Visarjan 2024 : गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर आज (बुधवार, १७ सप्टेंबर) रोजी विसर्जन होत आहे. पुण्यामध्ये घरगुती गणपतीसोबतच सार्वजनिक मंडळाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली असून मोठया थाटामाटात, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे.
पुण्यात सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरुच असल्या तरी पाच मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडले आहे. कसब्याचा गणपती हा पुण्यातील पहिला मानाचा गणपती. तर तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मानाच्या गणपतींचे गतवर्षी प्रमाणे यंदाही सायंकाळी आठच्या आत विसर्जन करण्यात आले आहे. यंदा मानाच्या पाचही गणपती (Kasba Ganpati,Tambdi Jogeshwari Ganpati,Guruji Talim Ganpati,Tulshibaug Ganpati,Kesariwada Ganpati) विसर्जन मिरवणुकीला तब्बल 8 तास लागले आहेत. जाणून घेऊया मानाच्या पाचही गणपतीच्या विसर्जनाच्या वेळा आणि विसर्जनाचे व्हिडीओ (Video) …..
1. कसबा गणपती….
कसबा गणपती मंडळाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी साडेदहा (10.30 AM) वाजता चांदीच्या पालखीतून निघाली. त्यानंतर सकाळी 11.10 वाजता ही मिरवणूक बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्ता मार्गे दुपारी 3.25 वाजता टिळक चौकात आली. त्यानंतर नटेश्वर घाटावर कसबा गणपती बाप्पाची आरती करण्यात आल्यानंतर दुपारी 4.34 वाजता कसबा गणपतीचं कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाची माहिती देणारा विशेष रथ, रमणबाग ढोल-ताशा पथक,परशुराम आणि रूद्रगर्जना ढोल-ताशा पथक, प्रभात बँडपथकासह आर्ट ऑफ लिव्हिंग, कामायनी संस्था, रोटरी क्लबच्या परदेशी पाहुण्याचा मिरवणुकीत सहभाग हे यंदा कसबा गणपती विसर्जन मिरवणूकीचे वैशिष्ट्य ठरले.
View this post on Instagram
2. श्री तांबडी जोगेश्वरी गणपती….
मानाचा दुसरा गणपती म्हणजे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन सांयकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी करण्यात आले. तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणरायाची मिरवणूक यंदाही पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून काढण्यात आली होती. डेक्कन येथील नदी पात्रालगत पर्यावरण पूरक पद्धतीने या वर्षी देखील तांबडी जोगेश्वरी गणपतीचे अतिशय भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं.
3. गुरुजी तालीम गणपती
पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन जल्लोषात संपन्न झाले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जय घोषात सायंकाळी 6 वाजून 44 मिनिटांंनी बाप्पाला निरोप देण्यात आला. ‘सूर्य’ रथातून श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे गुलालाची उधळण, गुलाबी झालेले सगळे कार्यकर्ते, ढोल ताशांचा जोरदार गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली होती. यावेळी नादब्रह्म ढोल ताशा पथकाने आकर्षक वादन करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. आणखी एक विशेष म्हणजे पुण्यातील गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत शिखंडी या ढोल-ताशा पथकाने देखील वादन केले. “शिखंडी” हे ढोल-ताशा पथक भारतातील पहिले तृतीयपंथीयांचे ढोल-ताशा पथक आहे.
4. तुळशीबाग गणपती…
पुण्याच्या मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपतीचेही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. श्री तुळशीबाग गणपतीचे 7 वाजून 12 मिनिटांनी विसर्जन झाले. सकाळी 10.30 वाजता टिळक पुतळा मंडई येथून पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत श्रींच्या मिरवणुकीस सुरुवात झाली होती. यंदा बाप्पांची मिरवणूक जगन्नाथ पुरी रथातून निघाली. फुलांनी सजवलेल्या 32 फुट उंच रथातून ही मिरवणूक निघाली होती. पुरी येथील श्री जगन्नाथाच्या रथाप्रमाणे बाप्पांचा रथ कार्यकर्त्यांनीच ओढला. आणखी एक म्हणजे मिरवणुकीत अग्रभागी लोणकर बंधूंचे नगारावादन, स्व-रुपवर्धनी, गजलक्ष्मी ही वाद्य पथके सहभागी झाली. मिरवणुकीत – स्वरूपवर्धिनीची मल्लखांबची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
5. केसरीवाडा गणपती…
पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीचे म्हणजेच श्री केसरीवाडा गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन झाले आहे. केसरीवाडा गणपतीचे संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी विसर्जन झाले. या विसर्जनानंतर पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन संपन्न झाले आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. परंपरेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीत गणराय विराजमान झाले होते. श्रीराम, शिवमुद्रा, आवर्तन ढोल-ताशा पथकाने उत्कृष्ट वादन केले. तसेच बिडवे बंधुचा सनई-चौघडा मिरवणुकीत अग्रभागी राहिले. इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे लोकमान्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला ‘माऊली’ रथ मिरवणुकीचे आकर्षण ठरला.
अशाप्रकारे लाडक्याला बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर आलका टॉकीजच्या चौकात ढोल ताशा वादनाचे प्रत्येक पथकाने सादरीकरण केले. यावेळी बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच ढोल ताशाच्या ठेक्यावर नाचण्याचा आनंद घेत भावपूर्ण वातावरणात गणपती बाप्पांना निरोप दिला.





