Pune : गंगाधाम चौकाला मिळणार संजीवनी

पुणे – वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघाताने चर्चेत असलेल्या गंगाधाम चौकाला आता संजीवनी मिळणार आहे. आई माता मंदिर ते गंगाधाम चौक या दरम्यानचा तीव्र उतार (स्लोप) कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हा उतार अडीच मीटरने कमी होणार असून त्यासाठीच्या ९ कोटी १६ लाखांच्या निविदेस पालिकेने मान्यता दिली आहे. यानंतर चौकातील अपघात नक्की कमी होतील अशी अपेक्षा आहे.
गेल्या काही वर्षांत या चौकात अनेक अपघात झाले होते. अवजड वाहने असो किंवा वाहनांची धडक असो, त्यातील प्राणांतिक अपघाताने हा चौक शहरभर प्रसिद्धीस आला होता. त्याशिवाय या परिसरात अवजड आणि अन्य वाहनांची वाहतूक लक्षणीय आहे. यामुळे येथील अपघात रोखण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलीस संयुक्त उपाययोजना करत आहेत. त्याचाच भाग म्हणून हा उतार कमी करण्यात येणार आहे.
सव्वा नऊ कोटींची निविदा
या कामासाठी ९ कोटी १६ लाख ९९ हजारांची निविदा काढण्यास शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामात पाणी, सांडपाणी वाहिन्या जिरवणे, तसेच नवीन स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (पावसाच्या पाण्याचा निचरा) वाहिन्या टाकणे प्रस्तावित आहे.
उतारात अडीच मीटरची घट
पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , येथील रस्त्याचा उतार सध्या १२.३० मीटर आहे (चढावरून सपाट जमिनीकडे). हा उतार आता २.५ मीटरने कमी होणार आहे. त्यासाठी ६०० मीटर लांबीच्या रस्त्याचा ५०० मीटरचा भाग खोदला जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या सेवा वाहिन्याही आणखी खाली जातील.
या रस्त्याला आठ ते नऊ रस्ते बाजूने येऊन मिळतात. त्यामुळे तेथील उतार लक्षात घेऊन हे काम होणार आहे. या कामासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पावसाळा संपल्यानंतर हे काम हाती घेतले जाणार असून, पुढील पावसाळ्यापर्यंत ते पूर्ण होईल. त्यानंतर रस्ता वापरासाठी उपलब्ध होऊल.
‘या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक असते. त्यातच, तीव्र उतारामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने प्राणांतिक अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हा उतार कमी केला जाणार आहे. या कामास मान्यता देण्यात आली असून, पुढील ९ महिन्यांत ते पूर्ण केले जाणार आहे.’ – अनिरुद्ध पावसकर (पथ विभाग प्रमुख)





