pune ganesh visarjan: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत डीजेचा गोंधळ; अभिनेता सौरभ गोखलेचा संताप

pune ganesh visarjan: देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडला. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मुंबई आणि पुण्यासह अनेक शहरांमध्ये पारंपरिक ढोल-ताशांसोबतच डीजेच्या गोंगाटात विसर्जन मिरवणुका पार पडल्या. पण या डीजेमुळे पारंपरिक वाद्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसलं. याचाच एक वाईट अनुभव मराठी अभिनेता व ढोल वादक सौरभ गोखले याने शेअर केला आहे.
सौरभ स्वतः ‘कलावंत’ नावाच्या ढोल पथकात वादन करतो. तो म्हणाला,
“गणेश विसर्जनाच्या दिवशी आम्ही मार्केट यार्ड गणेश मंडळासोबत वादन करणार होतो. संध्याकाळी ६ वाजताची मिरवणूक होती. आम्ही तयार होतो. पण टिळक रोडवर डीजेचा इतका धुमाकूळ होता की मिरवणूक पुढेच सरकत नव्हती. त्यामुळे सगळ्या मंडळांना अडचण आली. बराच वेळ थांबल्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही आणि अखेरीस आम्हाला वादन रद्द करावं लागलं.”
तो पुढे म्हणाला,
“त्या कर्णकर्कश्य डीजेच्या आवाजात लोक नाचत रममाण झालेले पाहून खूप वाईट वाटलं. असं वाटलं की लोकांना पारंपरिक वाद्यांपेक्षा डीजेचाच जास्त मोह आहे. त्यामुळे आम्ही आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की वादन न करता ध्वजवंदन करून मिरवणुकीला पूर्णविराम द्यावा.”
सौरभने आपल्या व्हिडीओमध्ये आवाहन करताना सांगितलं,
“हा मुद्दा सगळ्यांच्या लक्षात यावा म्हणून मी हे बोलतोय. डीजेच्या धुमाकुळाला ब्रेक लागणं गरजेचं आहे. नाहीतर काही दिवसांतच त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. आपण सगळ्यांनी पुन्हा पारंपरिक वाद्यांकडे वळलं पाहिजे.”





