‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिजची घोषणा; मराठमोळा अभिनेता सौरभ गोखले दिसणार मुख्य भूमिकेत

मुंबई – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर अनेकदा कॉँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले होते. यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ हिंदी वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. यामाध्यमातून सावरकर यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलघडणार आहे. नुकतेच या वेबसिरिजचे पोस्टर आणि टीझर र प्रदर्शित करण्यात आले आहे.
‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ या वेब सीरिजमध्ये अभिनेता सौरभ गोखले वीर सावरकरांची भूमिका साकारणार आहे. याबाबत त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिले की, “मी विनायक दामोदर सावरकर! तात्याराव सावरकर… हिंदुहृदयसम्राट सावरकर… स्वातंत्र्यवीर सावरकर… होय आणि माझ्या टीकाकारांच्या मते देशद्रोही सावरकर… देशद्रोही आणि सावरकर? मी माझ्याबद्दल फार बोललो नाही…काळ खूप वेगाने पुढे सरकत आहे…”
“इतिहास नाहीसा होतो मग विनायक दामोदरसारख्या सामान्य माणसाची गोष्ट कोण लक्षात ठेवील? पण कथा कोणा एका विशिष्ट व्यक्तीची नाही.. ती व्यक्ती घडवणाऱ्या सामान्य-असामान्य लोकांची आहे! तो ज्या मातीत जन्मला, जिथे तो वाढला, त्याचा इतिहास म्हणजे त्याची कहाणी. माझी गोष्ट सांगायच्या आधी मनात विचारांचे वादळ उठले… माझ्या आयुष्याबद्दल कसं सांगू? मी काय सांगावं ? आणि आणखी…’वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’…लवकरच”
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तिमत्त्वाकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष झालेले आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून ही भूमिका मांडण्याचे काम केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सावरकर यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून टीकेला उत्तर दिले जाणार आहे. परंतु, टीकेला उत्तर म्हणून काही बनवण्यापेक्षा आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले स्वातंत्र्यवीर प्रेक्षकांसमोर आले पाहिजेत. ही त्यामागची भावना आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित ही वेबसिरीज नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
View this post on Instagram
या वेबसिरीजच्या नवीन पोस्टरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतले आहे. यात सौरभ काळा कोट आणि काळी पँटमध्ये दिसत आहे. तर त्याच्या मागे एका झेंड्यावर ‘वंदे मातरम’ असे लिहिलेले दिसते. ही वेब सीरिज पुढच्या वर्षी 26 फेब्रुवारीला वीर सावरकरांच्या पुण्यतिथीला प्रदर्शित होणार आहे. या हिंदी वेब सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार आहेत. तर निर्मिती डॉ. अनिरबन सरकार करणार आहेत. ही सीरिज तीन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.





