Pune News | विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त ; मार्गावर सीसीटीव्ही, वॉच टॉवर्स

प्रभात वृत्तसेवा
पुणे – विसर्जन मिरवणुक सुरळीत पार पाडण्यासाठी अतीवरिष्ठ, वरिष्ठांसह, अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलासह तब्बल आठ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात राहणार आहेत.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार आणि सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा तसेच विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन केले आहे.
मिरवणूक शांततेत, सुरक्षित पार पाडणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे,’ असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विसर्जन मिरवणुकीत विशेषतः मानाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीच्या मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा असणार असून सीसीटीव्ही कॅमेर्यांचा सतत वॉच असेल. गर्दीच्या ठिकाणी मदत केंद्रे, वॉच टॉवर आणि चौकाचौकात निरीक्षण मनोरे असतील.
चेन चोरी, खिसेकापू किंवा जबरी चोरीसारखे गुन्हे रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांना नियुक्त केले आहे. यावेळी लेझर लाईट्स किंवा घातक दिव्यांच्या वापरास मनाई आहे. नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी मदत केंद्रे उभारण्यात येणार असून वैद्यकीय मदतीसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. विसर्जनाची सांगता होईपर्यंत शहर व उपनगरांमध्ये सतत पोलीस गस्त राहणार आहे.
असा असेल बंदोबस्त..
-अप्पर पोलीस आयुक्त ४
-पोलीस उपायुक्त १२
-सहायक पोलीस आयुक्त ३३
-पोलीस निरीक्षक १४१
-सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ५५८
-कर्मचारी ६४४३
-होमगार्ड. ९७२





