पुणे – पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या पहिल्या मजल्याच्या जतन, संवर्धनासाठी जिल्हा नियोजन निधीतून ४० लाखांचा निधी मंजूर झाला असून कामाचा प्रारंभ आषाढी एकादशीदिनी आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. रासने यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे निधी मिळाला आहे.श्री कसबा गणपती मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मानाचा गणपती मानले जाते. यावेळी रासने म्हणाले, मंदिर आपल्या परंपरेचे प्रतीक आहे. त्याच्या जतन, संवर्धनासाठी निधी मिळवणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. निधीमुळे मंदिराच्या पहिल्या मजल्याचे ऐतिहासिक मूल्य जपले जाणार आहे. हे काम पुण्याच्या धार्मिक, सांस्कृतिक वारशासाठी मोलाचे आहे. यावेळी कसबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष विनायक ठकार, विश्वस्त संगीता ठकार, चतुर्थी कसबा गणपती मंडळ अध्यक्ष श्रीरंग होनप, सुनील पारखी, सुहास कुलकर्णी, अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे आदी उपस्थित होते.