Pune : एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा

पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. एफटीआयआयला विशिष्ट (डिस्टिन्क्ट) श्रेणीमध्ये हा दर्जा देण्यात आला असून, याबाबतचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी एफटीआयआय ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित संस्था आहे. २०१४ मध्ये भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी एफटीआयआयला सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा देण्याची घोषणा केली होती.
मात्र. त्यावर काही कार्यवाही झाली नव्हती. काही महिन्यांपूर्वी विद्यमान माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एफटीआयआयला दिलेल्या भेटीदरम्यान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
एफटीआयआयचा प्रस्ताव विचारात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलै २०२४ मध्ये तज्ज्ञ समिती नियुक्त केली. युजीसीच्या सल्ल्यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी काही अटींची पूर्तता तीन वर्षांत करण्याच्या अधीन राहून इरादापत्र देण्यात आले. त्यानुसार एफटीआयआयच्या संचालकांनी जानेवारी २०२५ रोजी पूर्ततेसंदर्भातील अहवाल यूजीसीला सादर केला होता. यूजीसीने तो प्रस्ताव तज्ज समितीसमोर ठेवला. तज्ज्ञ समितीच्या शिफारशी यूजीसीच्या मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आल्या होत्या.





