Pune : मिशन चकाचकसाठी चार नवी स्वीपर मशीन

पुणे : शहर स्वच्छतेसाठी पालिकेच्या ताफ्यात चार व्हॅक्यूम ऑपरेटेड रोड स्वीपर मशिन्स आली आहेत. त्याचा वापर रस्ते, फुटपाथ, सायकल मार्ग, कचरा कुंड्या, दुभाजक आणि स्ट्रीट फर्निचरच्या सफाईसाठी होणार आहे. पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री या मशिनचे लोकार्पण झाले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, तसेच ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटचे दिप सिंग उपस्थित होते.
पालिकेकडून एकूण १२ स्वीपिंग मशिनद्वारे सफाई होणार असून, त्यापैकी चार मशिनचा वापर शुक्रवार रात्रीपासून सुरू झाला. शहराच्या विस्तारामुळे पालिकेचे क्षेत्रफळ सुमारे ५१६ चौ. कि.मी.पर्यंत वाढले आहे. लोकसंख्या सुमारे ७० ते ८० लाखांवर पोहोचल्याने स्वच्छतेसाठी यांत्रिकीकरण आवश्यक झाले आहे. केंद्राच्या सूचनेनुसार १८ मीटरपेक्षा रुंद रस्त्यांवर रोड स्वीपरचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पीएम २.५ व पीएम १० या सूक्ष्मधूळ कणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
असे होणार काम
पालिकेने निश्चित केलेल्या रस्त्यावर एक मेकॅनिकल रोड स्वीपर, ११ कामगार, २ पेव्हमेंट स्वीपर, २ लीफ ब्लोअर, १ ग्रास कटर, जेटिंग मशिन आणि १ छोटा हत्ती (सीएनजी टिपर) तैनात राहणार आहेत. यंत्रांद्वारे दररोज सुमारे ४० किमी क्षेत्राची स्वच्छता केली जाणार आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत झोन क्र. १ ते ४ मधील रस्त्यांची सफाई होईल. स्ट्रीट फर्निचर, दुभाजक ग्रिल्स, सायकल मार्ग, फुटपाथ आदी ठिकाणांचीही स्वच्छता होईल.
या मेकॅनिकल स्वीपिंग मशिनमध्ये ६.५ क्युबिक मीटर क्षमतेचा कचरा हॉपर व ३००० लिटर पाण्याची टाकी आहे. वॉशर व स्प्रिंकलर यंत्रणा धूळ कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या एक तास आधीच कार्यरत केली जाईल. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण कमी होईल.





