महाराष्ट्र, गोव्यातील 5500 धार्मिक स्थळांची स्वच्छता; 60 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग, विहिंपचा उपक्रम

नागपूर – विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक पुरोहित आयामाने केलेल्या मंदिर स्वच्छता अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा मिळून विश्व हिंदू परिषदेसह विविध संस्था संघटना, उपासना मंडळ, धार्मिक सामाजिक संस्था, मंडळ सर्व मंदिरे यांच्या ६० हजारावर भाविकांनी, महिला व पुरुषांनी मंदिरे, बौद्ध विहार, जैन स्थानक, गुरुद्वारे तसेच हिंदू धर्मातील सर्व धार्मिक स्थानांच्या स्वच्छतेसाठी उस्फूर्त सहभाग नोंदवला. अभियानाचे हे दुसरे वर्ष आहे.
यापैकी देवगिरी प्रांतात १८५०, कोकणमध्ये १५००, विदर्भात १२१०, पश्चिम महाराष्ट्र प्रांतात ८५० व गोवा राज्यात १५० या संख्येने ही मंदिर स्वच्छता सेवा देण्यात आली. २० ऑक्टोबरला सकाळी सात ते अकरा या चार तासात हे अभियान सर्वदूर राबवले गेले. मागील वर्षापासून मंदिर आयामाच्या वतीने उपक्रम राबवणे सुरू झाले आहे. मागच्या वर्षी ५५० मंदिरांमध्ये स्वच्छता सेवा दिली होती.
मंदिर स्वच्छता अभियानासाठी मागील एक महिन्यापासून तयारी सुरु होती. यासाठी विविध संस्था संघटनांबरोबर बैठका संपन्न झाल्या. मंदिरांसह सर्व धार्मिक स्थानांच्या याद्या तयार करण्यात आल्या. मंदिर स्वच्छतेसाठी आवश्यक ते साहित्य झाडू, खराटे, पोछा, इलेक्ट्रिक ब्लोअर इत्यादीची उपलब्धता स्थानिक स्तरावर करण्यात आली.
साडेतीन हजार बॅनरद्वारे आवाहन
मंदिर स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदवावा अशा आशयाचे ३५०० बॅनर मंदिरांवर लावण्यात आले होते. ते वाचून अनेक भाविक महिला पुरुष अभियानात सहभागी झाले. अनेक मंदिरांनी आपल्या मंदिरांसोबत दुसऱ्या मंदिराची जबाबदारी घेत तिथे पण स्वच्छता असे सेवा केली.
मंदिरावर ध्वज आणि रोषणाई
सर्व मंदिरांशी संपर्क करून त्यांनी दिवाळीच्या आधी मंदिरावर नवीन ध्वज लावावा आणि दीपावलीच्या काळात चार दिवस रोषणाई करावी आणि समाजाच्या विविध जातींच्या तरुण जोडप्यांच्या हस्ते ध्वज पूजन करावे आणि हे मंदिर प्रत्येक हिंदू समाजाची आहे प्रत्येकाला त्यात स्थान आहे संधी आहे समरसतेचा भाव कृतीतून जागृत करावा, अशी विनंती सर्व मंदिर विश्वस्तांना करण्यात आली आहे.





