Pune: वनराज आंदेकर खूनप्रकरणात बहिणीसह चौघांना अटक

पुणे – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यामध्ये वनराजची सख्खी बहीण आणि तिच्या पतीचा समावेश आहे. या प्रकरणी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरवर पाहता, हे प्रकरण कौटुंबिक तसेच संपत्तीच्या वादातून झाल्याचे दिसत असले, तरी त्याला गँगवॉरचीही एक किनार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाना पेठेत वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून गुन्हे शाखेची दहा आणि पोलीस ठाण्याची चार ते पाच पथके गुन्हेगारांच्या मागावर पाठवली. दरम्यान, वनराज यांचे वडील सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (६८, रा. नानापेठ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी संजीवनी कोमकर, तिचा पती जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि कल्याणी कोमकर, प्रकाश कोमकर, सोमनाथ कोमकर, अनिकेत दूधभाते, तुषार कदम, सागर पवार, पवन करताल, सॅम काळे यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील जयंत, संजीवनी, गणेश आणि कल्याणी यांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, मुलगी संजीवनी व जयंत हे दुकानावर दगडफेक केल्या प्रकरणात आकाश परदेशी याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी रविवारी समर्थ पोलीस ठाण्यात आली होती. तेव्हा आकाशने वनराज आंदेकर, पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर व अॅड. मनोज माने यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. तेव्हा संजीवनी आणि जयंत यांनी आकाशला पोलीस ठाण्याच्या आवारातच चपलेने मारहाण केली.
ही भांडणे शिवम याने सोडवल्यावर आकाशच्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. यावर चिडून संजीवनीने वनराजला धमकी दिली की, “वनराज आम्ही तुला जगू देणार नाही, तू आमच्यामध्ये आला आहेस, तू आमचे दुकान पाडून आमच्या पोटावर पाय देतोस का? तुला आज पोरं बोलावून मारतेच’ अशी धमकी दिली. यानंतर रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तींनी वनराज आणि शिवम यांच्या दिशेने धाव घेतली. ते दोघे पळून जात असताना वनराज याच्यावर गोळीबार करण्यात आला.
तेव्हा समोरच राहणाऱ्या संजीवनी व जयंत कोमकर यांनी बाल्कनीतून “मारा मारा, त्यांना सोडू नका, जीवे ठार मारा’ असे म्हणून चिथावणी दिली. गोळीबारात खाली पडलेल्या वनराजवर आरोपींनी धारदार हत्याराने १४ ते १५ वार करत खून केला. यामुळे संजीवनी हिनेच सुपारी देऊन ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.





