पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातर्फे फ्रेंच, जर्मन, जपानी, रशियन, स्पॅनिश या परकीय भाषांच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना येत्या 31 मे पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येणार आहे. दि. १ जून ते ८ जून या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी १४ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. परकीय भाषांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्काचा तपशील विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केला आहे. खुल्या गटासाठी प्रवेश अर्ज शुल्क ८०० रुपये, तर आरक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. विद्यापीठाचे हे अर्धवेळ अभ्यासक्रम ऐच्छिक आहेत. त्यास कोणत्याही प्रकारची शुल्क सवलत लागू असणार नाही. प्रत्येक भाषेचे अभ्यासक्रमासंबंधीचे चार टप्प्पे आहेत. त्यानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने हे अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. अभ्यासक्रमानुसार २० ते ५० विद्यार्थी संख्येपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्न कोणत्याही महाविद्यालयात किंवा विद्यापीठाच्या विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास जास्तीचे क्रेडिट मिळतील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.