Pune : चांगल्या चित्रपटांसाठी प्रसिद्धी, वितरणही सक्षम हवे

पुणे : सर्व भाषांतील चित्रपटांसाठी प्रेक्षक येत नाहीत, अशी सारखीच आव्हाने आहेत. यावर एकमेव उत्तर म्हणजे चांगला चित्रपट बनवला पाहिजे. तुमच्या दृष्टीने चांगला असलेला चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चालेल, याची खात्री नाही. समस्याप्रधान चित्रपट हेच चांगले असतात, असा एक समज आहे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. असाच समज आणि संस्कार लहानपणापासून झालेले असतात आणि त्याला समीक्षकही पुढे नेतात, असे मत लेखक, दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी व्यक्त केले.
२३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (पिफ) मध्ये आज मराठी चित्रपटासमोरील आव्हाने : निर्मिती आणि प्रेक्षक, या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निर्माते सुनील फडतरे, लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी, अभिनेते दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सहभागी झाले होते. मराठी चित्रपट चालण्यासाठी चांगल्या कथा असायला हवी; पण ते चालण्यासाठी प्रसिद्धीच्या आणि वितरणाच्या चांगल्या कल्पनाही पुढे आल्या पाहिजेत, असे मत उपस्थित निर्माते आणि दिग्दर्शकांनी व्यक्त केले.
लोक चित्रपट पाहता केवळ सोशल मीडियावर व्यक्त होतात. त्याचाही प्रेक्षकांवर परिणाम होतो. गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी आल्यापासून तर फार वाईट परिस्थिती झालेली आहे. दक्षिणेकडे घरटी व्यक्ती आठवड्याला एक चित्रपट पाहते. महाराष्ट्रात तसे होत नाही. पूर्वी एक पडदा चित्रपटगृह असताना चित्रपट तिकिटाचे दर कमी होते. आता मल्टिप्लेक्समुळे दर वाढले आहेत, त्याचाही परिणाम दिसतो आहे, असे फडतरे यांनी सांगितले. मराठी चित्रपटाला जोखीम पत्करणारे लोक हवे आहेत. कॉर्पोरेट कंपन्या मराठी चित्रपट पुढे नेत नाहीत. त्यासाठी त्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर मराठी व्यक्ती असणे गरजेचे आहेत. दाक्षिणात्य चित्रपट देशभर जाण्यासाठी विविध वाहिन्यांनी हातभार लावला, असे निरीक्षण कोठारे यांनी नोंदवले.
मराठी चित्रपट मार्केटिंग आणि प्रसिद्धी करण्यात कमी पडतो. अजूनही पारंपरिक गोष्टी वापरून प्रसिद्धी केली जाते. त्यामुळे वेगळ्या कल्पना आणण्यावर विचार केला पाहिजे. वितरण, प्रदर्शनामध्ये त्या आणल्या पाहिजेत. यासाठी उत्तम एजन्सी नाहीत, अशी खंत सरपोतदार यांनी व्यक्त केली.




