pune : बांधकाम शुल्क करवसुलीवर भर
pune :

महसूल समितीच्या पहिल्याच बैठकीत निर्णय
pune : महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी स्वतंत्र महसूल समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीची पहिली बैठक पार पडली. महापालिकेच्या सर्व महसुली स्रोतांचा आढावा घेऊन उत्पन्नवाढीसाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महसूल समितीत स्थायी समितीचे १६ सदस्य असून, प्रत्येक राजकीय पक्षाच्या एका सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये भाजपचे सनी निम्हण, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे दत्तात्रय धनकवडे, काँग्रेसचे अविनाश सावळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे काका चव्हाण आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नितीन गावडे यांचा समावेश आहे.
या बैठकीत बांधकाम, मिळकत कर, आकाशचिन्ह विभागासह अन्य विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. २०२६-२७ मध्ये बांधकाम परवाने व विकास शुल्कातून ३ हजार ६५६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ४५८ कोटी रुपये जमा झाले आहेत.
समाविष्ट गावांतील बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेकडे आल्याने पीएमआरडीएकडील सुमारे १४ हजार प्रकरणे, त्यापैकी १२५ बांधकाम परवान्यांची प्रकरणे महापालिकेकडे वर्ग होणार असून, त्यांचा जलद निपटारा केल्यास उत्पन्नात वाढ होईल, असे भिमाले यांनी सांगितले.
मिळकतकरातून ३ हजार ८५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, १ हजार ३९५ कोटी रुपये जमा झाले आहेत. समाविष्ट गावांतील सुमारे ४.५० लाख मालमत्तांमधून ६५० ते ८५० कोटी रुपयांच्या महसुलाचा अंदाज असून, तीन लाखांहून अधिक मालमत्तांचे करनिर्धारण अद्याप बाकी आहे.
पाणीपट्टीची ९०८ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याबरोबरच जीएसटी परतावा, मेट्रो सेस आणि विविध शासकीय अनुदानासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.




