Pune : सीईटीत पाच विद्यार्थी अव्वल; तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर

पुणे – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेतलेल्या तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या परीक्षेत राज्यातील पाच विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले. राज्यभरातून या परीक्षेसाठी ९४ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ हजार ६२१ म्हणजेच ७८.९६ टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते.
या प्रवेश परीक्षेत गणेश चौधर, सोमनाथ सुधांशू, श्रीहरी प्रभू, स्वप्नील सिंग, तन्मय चिंडालिया या पाच विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २ आणि ३ मे रोजी पाच सत्रांमध्ये घेण्यात आली. २ मे रोजी तीन सत्रे आणि ३ मे रोजी दोन सत्रे आयोजित करण्यात आली होती.
दि. २ मे रोजीच्या सकाळच्या सत्रात १४ हजार ६८० विद्यार्थी, दुपारच्या सत्रात १५ हजार २६९ आणि तिसऱ्या सत्रात १५ हजार ३६६ विद्यार्थी उपस्थित होते. ३ मे रोजी सकाळच्या सत्रात १४ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुपारच्या सत्रात १४ हजार ७५४ विद्याथ्यांनी परीक्षा दिली. एकूण २९ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सविस्तर निकाल राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या https//cetcell.mahacet.org संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.





