Pune : बाचाबाचीतून दोनदा हवेत गोळीबार

पुणे : पुर्वीचा वाद मिटविण्यासाठी एकत्र आलेल्या व्यक्तींमध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान हवेत गोळीबार करण्याच्या प्रकारात झाली. याच घटनेत एकाला लाकडी दांडके आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी, लोणीकंद पोलिसांनी गणेश संजय चौधरी (२९), ओंकार अंकुश लांडगे (२५ ,रा. दोघे वाडेबोल्हाई) या दोघांना अटक केली आहे. तर इतर चार अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १३) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जुने वाडेबोल्हाईमाता मंदीराजवळ वाडेबोल्हाई परिसरात घडली आहे. याप्रकरणी अजित महादेव जाधव (२६, रा. जाधव वस्ती, मु. पो. बकोरी) याने फिर्याद दिली आहे. तर जुनैद शेख असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश चौधरी आणि फिर्यादी अजित जाधव या दोघांचा काही कारणातून वाद झाला होता. त्यावेळी अजित याने गणेश याच्या कानशिलात लगावली होती. त्याचा राग गणेश याच्या डोक्यात होता. वाद मिटविण्यासाठी गणेश आणि अजित दोघे आप-आपल्या मित्रांना सोबत घेऊन येथील वाडेबोल्हाई परिसरात एकत्र आले होते. त्यावेळी वाडेबोल्हाई मंदीराकडून चौघे अनोळखी व्यक्ती आले.
त्यातील एकाने पिस्तूलातून दोन राऊंड हवेत झाडले. त्यावेळी सर्वांची पळापळ झाली. यानंतर जाधव याचा मित्र जुनैद शेख याला दुचाकीवरून खाली पाडून लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. दरम्यान,गोळीबाराची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.





