PUNE: सदनिकेत आगीची घटना; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

पुणे – सदाशिव पेठेतील एका सदनिकेत दुपारी आग लागली. अग्निशमन दलाने घरातील सिलेंडर तातडीने बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. अण्णा भाऊ साठे शाळेसमोर इमारतीत एका सदनिकेत आग लागल्याची वर्दी मिळताच दलाकडून कसबा व जनता अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आला होता. घटनास्थळी पोहोचताच या ठिकाणी तळमजला अधिक तीन मजले, अशा इमारतीत दुसऱ्या मजल्यावर एका सदनिकेत आग लागल्याचे पाहताच जवानांनी सदनिकेत प्रवेश करून आगीवर पाण्याचा मारा सुरू केला.
त्याचवेळी घरामध्ये कोणी आहे का याची खाञी केली. सुमारे पंधरा मिनिटात जवानांनी आग आटोक्यात आणत पुढील धोका दूर केला. घरामधील दोन भरलेले व इतर तीन रिकामे असलेले घरगुती सिलेंडर जवानांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविले. या आगीमध्ये सुदैवाने कोणी ही जखमी झाले नसून घरातील बॅटरी, इनवर्टर, वायरिंग, लाकडी कपाट, फर्निचर, गादी व इतर गृहपयोगी साहित्य पूर्ण जळाले आहे.
या कारवाईत वाहनचालक अनिकेत ओवाळ, ओंकार साखरे, प्रसाद शिंदे, तांडेल संजय गायकवाड व फायरमन निलेश माने, शुभम देशमुख, आदित्य परदेशी, सागर इंगळे यांनी सहभाग घेतला.
स्थानिकांच्या मदतीने नियंत्रण
कसबा पेठेतील एका वाड्यातील घराला लागलेली आग स्थानिक नागरिकांनी दरवाजा तोडून नियंत्रणात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. वाड्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात लाकडे वापरली असल्याने आग पसरण्याचा धोका होता.





