पुणे : रोहित्रांच्या ठिकाणी फायबर प्लॅस्टिकचे संरक्षक कुंपण

पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात प्रयोगिक तत्त्वावर वापर करण्याचा निर्णय
पुणे – पुणे व पिंपरी चिंचवडसह मुळशी, वेल्हे, हवेली, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील रोहित्र व डबल पोल स्ट्रक्चरच्या 250 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिकचे जाळीदार कुंपण लावण्यात येत आहे.
पुणे परिमंडलामध्ये सार्वजनिक गर्दीच्या, रस्त्याबाजूला, दाट वस्तीच्या, बाजारपेठांमध्ये आदी ठिकाणी वितरण रोहित्र आणि डबल पोल स्ट्रक्चर आहेत. या सार्वजनिक ठिकाणी वीजसुरक्षेच्या दृष्टीने परंपरागत लोखंडी जाळ्यांचे संरक्षक कुंपण लावण्यात आले आहे. तथापि पावसामुळे लोखंडी कुंपण गंजणे, सडणे, तुटणे, वाकणे, मोडतोड करून चोरी द्वारे भंगारात विकणे आदी प्रकार होत आहेत.
वीजसुरक्षेसाठी आवश्यक संरक्षक कुंपणावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून आता लोखंडाऐवजी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकचा पर्याय समोर आला आहे. फायबर प्लॅस्टिकच्या सुमारे सात-आठ फूट उंचीच्या जाळीदार संरक्षक कुंपनावर ऊन-पावसाचा कोणताही परिणाम होत नाही. सडत नाही तसेच आगीत जळत नाही.
मजबूत व टिकाऊ असल्याने तुटणे, खराब होणे सहजशक्य नाही. भंगारात या प्लॅस्टिकला काहीच किंमत नसल्याने चोरी होण्याचे प्रकार होणार नाही. पुणे परिमंडलामध्ये वीजसुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या रोहित्र व डबल पोल स्ट्रक्चरच्या 250 ठिकाणांची निवड करण्यात आली असून तेथे प्रायोगिक तत्त्वावर फायबर रीएनफोर्स्ड प्लॅस्टिकचे संरक्षक कुंपण लावण्यात येत आहे.




