pune : आयुर्वेदिक औषधसाठ्यावर एफडीएचा छापा; ५०.३६ लाखांचा माल जप्त
pune :

पुणे – शुक्रवार पेठेतील ‘कल्पतरू आयुर्वेद’ या आस्थापनावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापा टाकून विनापरवाना साठवून ठेवलेल्या भस्म व रस औषधांचा सुमारे ५०.३६ लाख रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला.
विनापरवाना भस्म व रस औषधांची विक्री होत असल्याची माहिती औषध निरीक्षकांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान प्लास्टिकच्या पिशव्या, बरण्या आणि बाटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भस्म व इतर औषधांचा साठा आढळून आला.
या साठ्यावरील बॅच क्रमांक, उत्पादन तारीख, मुदतबाह्यता तारीख, उत्पादकाचे नाव व पत्ता तसेच परवाना क्रमांक यांसारखी कायद्याने आवश्यक असलेली माहिती नमूद करण्यात आलेली नव्हती.
तपासणीदरम्यान आस्थापनाचे प्रमुख राकेश राजेंद्र शिर्के यांना संबंधित औषधांच्या खरेदीची बिले तसेच मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले. मात्र, ते आवश्यक कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे संशयास्पद औषधसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या औषधसाठ्याची अंदाजे किंमत ५०.३६ लाख रुपये असून, या प्रकरणी पुढील तपास अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे.





