पुणे – शासकीय नोकरीच्या आमिषाने एका महिलेची १९ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी सुनील नामदेव गडकर आणि किरण सुनील गडकर (रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, एका महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कात्रज भागात राहात असून, गडकर यांची महिलेशी एका परिचितामार्फत ओळख झाली.
आरोपींनी महिलेला शासकीय विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी करून नोकरीच्या आमिषाने वेळोवेळी १९ लाख १९ हजार रुपये घेतले.
महिलेने गडकर यांना जुलै महिन्यात पैसे दिले. त्यानंतर महिलेला नोकरी न मिळाल्याने तिने आरोपींकडे विचारणा केली. त्या वेळी गडकरने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड तपास करत आहेत.