Pune : मैत्री, संगीत आणि भावनांचा सुरेल प्रवास; ‘दोस्तीचं दुकान’ प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Pune: या प्रयोगाची कथा सहा मित्रांभोवती फिरते. पुणे, सातारा, सांगली आणि अमरावतीसारख्या महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले हे मित्र त्यांच्या एका मित्राच्या लग्नानिमित्त विदर्भातील वरूड येथे अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येतात...

Pune : मैत्री, संगीत, गप्पा आणि तरुणाईच्या भावविश्वाचा सुरेख संगम घडवणारा ‘दोस्तीचं दुकान’ हा सांगीतिक प्रयोग सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत आहे. मैत्रीतील भावनिक आणि हलक्या-फुलक्या क्षणांना स्पर्श करणारा हा प्रयोग तरुण प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरत आहे.
या प्रयोगाची कथा सहा मित्रांभोवती फिरते. पुणे, सातारा, सांगली आणि अमरावतीसारख्या महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले हे मित्र त्यांच्या एका मित्राच्या लग्नानिमित्त विदर्भातील वरूड येथे अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काळानुसार अनेक बदल, संघर्ष आणि अनुभव आलेले असतात. कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पा, जुन्या आठवणी आणि गाण्यांच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडत जातात. हसत-खेळत पुढे सरकणारा हा प्रवास अखेरीस मैत्री आणि आयुष्याबद्दल एक सकारात्मक संदेश देऊन जातो.
या प्रयोगाची संकल्पना संविता दीप डबरे यांची असून, स्क्रिप्टच्या विविध ड्राफ्ट्सवर जवळपास तीन ते चार महिने काम करण्यात आले. याच दरम्यान नितीश पाटणकर यांची भेट झाली. प्रयोगातील फ्रेश लेखनशैली, गाणी आणि विषयातील ताकद पाहून त्यांनी निर्माता म्हणून या प्रकल्पाला पाठिंबा दिला. त्यानंतर ‘दृकश्राव्य’च्या माध्यमातून नितीश पाटणकर आणि आदित्य मोडक यांनी निर्मितीची धुरा सांभाळली. तसेच कुशल खोत यांच्या ‘वाइड विंग्ज मीडिया’ संस्थेचीही निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
प्रयोगाचा फॉरमॅट वेगळा असल्याने कलाकारांसोबतची improvisation आणि creative process टप्प्याटप्प्याने विकसित होत गेली. सुरुवातीला गाण्यांची बांधणी करण्यात आली. त्यानंतर स्क्रिप्ट रीडिंग आणि सादरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. कलाकार, संगीत आणि टीमवर्क यांच्या जोरावर हा प्रयोग अधिक समृद्ध होत गेला.
या संपूर्ण प्रक्रियेत झपूर्झा आर्ट अँड कल्चर म्युझियम आणि पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांनी थिएटर स्पेस उपलब्ध करून दिली, तर चितळे बंधू यांनी प्रायोजक म्हणून मोलाची साथ दिली.
दरम्यान, प्रयोगातील दोन गाण्यांच्या रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘दोस्तीचं दुकान’विषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली. त्यानंतर ३ जून रोजी ‘द बॉक्स’ येथे झालेला पहिला प्रयोग हाऊसफुल ठरला. तसेच M.E.S. ऑडिटोरियम येथे झालेल्या दुसऱ्या प्रयोगालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकारात्मक प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांचा वाढता सहभाग यामुळे संपूर्ण टीमला आगामी प्रयोगांसाठी नवी ऊर्जा मिळाल्याचे निर्मात्यांनी सांगितले.
आता या प्रयोगाचे पुढील प्रयोग ७ जून रोजी बोरिवली आणि रवींद्र नाट्य मंदिर, दादर येथे, तर १३ जून रोजी पुण्यातील श्रीराम लागू रांगमंच येथे आयोजित करण्यात आले आहेत. आगामी प्रयोगांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास टीमकडून व्यक्त करण्यात येत आहे.






