Pune Elections : पुणे जिल्ह्यात 7 नगराध्यक्ष महिला ; आरक्षण सोडतीत महिलांचा डंका

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपदाची सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांपैकी 4 ठिकाणी आणि 4 नगरपंचायतींपैकी 3 ठिकाणी नगराध्यक्षपद महिलांकडे जाणार आहे. तसेच दोन ठिकाणी अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव राहणार आहे. आठ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदे खुली राहणार आहेत. बुधवारी (दि. 8) यासर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर आणि जुन्नर येथील नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव राहणार आहे. तर चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असेल. त्यामुळे या चार नगरपरिषदांमध्ये महिला नगराध्यक्षा असतील. फुरसुंगी-उरळी देवाची आणि लोणावळा नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. यंदा पुणे जिल्ह्यात मंचर, माळेगाव आणि वडगाव मावळ या नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
यापैकी मंचर नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव राहील, तर वडगाव मावळ नगरपंचायतींची नगराध्यक्षपदे खुल्या प्रर्वगातील महिलेसाठी खुले राहणार आहे. याच बरोबर माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार आहे.
देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षणही जाहीर..
देहू नगरपंचायतीचा कार्यकाळ जानेवारी 2027 मध्ये संपणार आहे; मात्र त्यावेळी वेगळी प्रक्रिया राबविण्याऐवजी आताच नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. देहू नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे.





