PCMC Election: दीडशे अपक्षांना चिन्ह वाटप! काहींना मिळाली बॅट तर काहींच्या हाती कपबशी

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होत असून, अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल १४९ अपक्ष उमेदवारांना विविध चिन्हे देण्यात आली आहेत.निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या या चिन्ह वाटप प्रक्रियेमुळे आता प्रचाराला अधिक वेग येणार आहे.
कुणाच्या हाती क्रिकेटची बॅट तर कुणाच्या हाती कपबशी, कुणाला शिडी, छत्री, पतंग, टॉर्च, गाडी अशी विविध चिन्हे मिळाली असून, या चिन्हांच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अपक्ष उमेदवार सज्ज झाले आहेत. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसोबतच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने अनेक प्रभागांमध्ये हायव्होल्टेज लढती होण्याची चिन्हे आहेत.
त्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याचा फायदा किंवा तोटा कुणाला होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, चिन्ह मिळताच अपक्ष उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.





