Haveli Panchayat Election : हवेली पंचायत निवडणूक रंगतदार! सभापतीपद सर्वसाधारण ; पूर्व हवेली बनणार ‘किंगमेकर’?

प्रभात वृत्तसेवा
सोरतापवाडी – हवेली पंचायत समितीच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सभापती पदाचे आरक्षण ‘सर्वसाधारण’ गटासाठी जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषतः पुर्व हवेलीतून सभापती पद मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांची प्रारूप यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध केली आहे.
हवेली तालुक्यात एकूण 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गण अस्तित्वात आले आहेत. यातील गट आणि गणांचे अंतिम आरक्षण 13 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांचे डोळे आता जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य निवडणूक आयोगाकडे लागले आहेत. पूर्व हवेलीतील उरुळी कांचन व सोरतापवाडी (उरुळी कांचन गट), थेऊर व आव्हाळवाडी (थेऊर गट), लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (लोणी काळभोर गट) तसेच केसनंद व कोरेगाव मुळ (कोरेगाव मुळ गट) हे गण सभापती पदासाठी स्पर्धेत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हवेलीपेक्षा पूर्व हवेलीतील गणांना सभापतीपद मिळण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे.
सभापती पद सर्वसाधारण गटासाठी आल्याने, काही इच्छुक उमेदवार जिल्हा परिषदेत आरक्षण मिळाले नाही तर पंचायत समिती निवडणुकीत भाग घेण्याची रणनीती आखत आहेत. काहींनी पक्षश्रेष्ठींकडे संपर्क वाढवून सावध मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक गणात उमेदवारांनी संभाव्य आरक्षणाच्या गणनेनुसार गावागावांत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काहींनी महिला किंवा खुल्या गटासाठीही सर्व तयारी केली आहे. आपल्याच सोयीचे आरक्षण पडेल का? या विचाराने इच्छुकांची धाकधूक वाढली असून पक्षश्रेष्ठींकडे फेर्या वाढल्या आहेत.
सभापती पद सर्वसाधारण असल्याने तरुणाईचाही सहभाग वाढला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखान्यांमध्ये तरुणांना संधी मिळाल्याने आता पंचायत समिती निवडणूकही तरुणांसाठी नवे व्यासपीठ ठरत आहे. दरम्यान, हवेली तालुक्यातील सर्व पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून प्रत्येक गटात एकमेकांवर मात करण्यासाठी जोरदार राजकीय आखाडा तयार होत आहे.
आघाडी की एकला चलो रे..
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि मनसे हे एकत्र येतील का? की भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) युती करणार? – यावरही चर्चा रंगली आहे. आघाडीतील कार्यकर्ते खरंच एकत्र राहतील का, की आतल्या गोटात विरोधकांनाच मदत करतील? या चर्चांनी हवेलीतील राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे.





