एलईडी स्क्रीन आणि सभागृहांमध्ये व्यवस्था
पुणे – सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना गुरूवारी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक निकालाची अत्यंत उत्सूकता असून अनेक कार्यकर्त्यांनी प्रभागामध्ये निवडणुकांचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्रभागांमध्ये असलेल्या सभागृहांमध्ये रस्त्यावर, वस्त्यांमध्ये, गावठाणांमध्ये लोकसभेचा लाईव्ह स्कोअर सर्व कार्यकर्त्यांनी एकाचवेळी पहावा यासाठी ही सोय करण्यात आली आहे. आपला नेता निवडून येणारच ही खात्री ज्या कार्यकर्त्यांची आहे, त्यांनी तर गुडघ्याला बाशींगच बांधले असून, अशाप्रकारे जल्लोषाची तयारीही त्यांनी केली आहे.
पुणे महापालिकेतही काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रभागातील सभागृह निवडणुकांचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी घेतला आहे. सकाळी सात वाजल्यापासून हा स्कोर कार्यकर्त्यांना पाहता येणार आहे. सकाळी सात वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुमारे साडेबारा वाजता सगळे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे देखील स्पष्ट होणार आहे.